बेंगळुरू – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चांद्रयान-3 ने मंगळवारी चंद्राच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. इस्रोचे चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडले असून हे अंतराळयान आता ट्रान्सलुनर कक्षेत ठेवले आहे. नॅशनल स्पेस एजन्सीच्या वतीने असे सांगण्यात आले की, “चांद्रयान-3 ने पृथ्वीभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण केली आहे आणि आता ते चंद्राच्या दिशेने जात आहे. इस्रो टेलिमिट्री, ट्रॅकींग आणि कमांड नेटवर्कने यशस्वी पेरीजी-फायरिंग केले.
इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी ट्रान्स-लूनर इंजेक्शननंतर, चंद्रयान-3 यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडले आणि आता ते चंद्राच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या मार्गाकडे जात आहे. आता हे चांद्रयान-3 येत्या 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लॅंडरचे सॉफ्ट लॅंडिंग करण्याचा प्रयत्नकरेल, असे इस्रोने जाहीर केले आहे.
वर्ष 2019 मध्ये चांद्रयान-2 मिशनचे लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले होते. त्यानंतरच भारताने चांद्रयान-3 मोहिमेची तयारी सुरू केली. चांद्रयान-2 प्रमाणेच चांद्रयान-3 च्या लॅंडरलाही विक्रम असे नाव देण्यात आले आहे.