सुमार कामगिरीचा कोहलीला फटका
लंडन – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला गेल्या काही मोसमात आलेल्या अपयशाचा चांगलाच फटका बसला आहे. वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार यंदा विश्वकरंडक स्पर्धा इंग्लंडला जिंकून देण्यात महत्वाचा वाटा उचलणारा अष्टपैलू बेन स्टोक्स याने कोहलीला पिछाडीवर टाकत पटकावला आहे.
पदार्पणापासून सातत्याने धावा करत कोहली रनमशिन बनला होता. गेल् सलग तीन वर्षे त्याने हा पुरस्कार पटकावुन आपले वर्चस्व राखले होते. मात्र, यंदा कोहलीच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. त्यातच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तर कोहलीला एकही अर्धशतकी खेळी करता आली नाही. दुसरीकडे स्टोक्सने यंदा इंग्लंड संघाला विश्वकरंडक स्पर्धा जिंकून देताना संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली.
द बायबल ऑफ क्रिकेट असे सार्थ वर्णन केले जाते त्या मविस्डेनफ या जगप्रसिद्ध क्रिकेट मासिकाने 2019-2020 सालचा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून स्टोक्सची निवड केली आहे.
कोहलीने 2016, 2017 आणि 2018 अशा सलग तीन वर्ष हा पुरस्कार मिळवला होता.स्टोक्सला हा सन्मान पहिल्यांदा मिळाला आहे. या वर्षी मात्र, विस्डेनच्या पुरस्कारांच्या यादीत एकाही भारतीय पुरुष अथवा महिला खेळाडूला स्थान मिळालेले नाही. यंदा ऑस्ट्रेलिाच्या पुरुष संघातील पॅट कमिन्स आणि मार्नस लाबुशेन तसेच इंग्लंडजा गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिमोन हार्मर यांना विस्डेनने स्थान दिले आहे.
वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आंद्रे रसेल याला टी-20तील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. विस्डेनने मुखपृष्ठावर इंग्लंडच्याच जोस बटलरला स्थान दिले आहे. त्यानेच विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलला धावाबाद केले होते व तिथेच इंग्लंडचा विजय निश्चित झाला होता. याच घटनेचा फोटो विस्डेनने प्रसिद्ध केला आहे.