मुंबई – महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत, अशी माहिती माझ्या कानावर आलीय. पण आपल्याला शिवसेनेसोबत कायम राहायचे आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत जुळवून घ्या, अशा सूचना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ते मुंबईत झालेल्या नेत्यांच्या बैठकीत बोलत होते.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे यांसह पक्षाचे अनेक नेते आणि मंत्री उपस्थित होते.
बैठकीत पराभूत झालेल्या उमेदवारांसोबतही यावेळी चर्चा झाली असून त्यांना पक्षात नवी भूमिका देऊन त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आहे. मतदान कमी का झाले? त्यामागील कारणे काय? भविष्यात कशा प्रकारे उपाययोजना करता येतील यासंदर्भातदेखील चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.