नवी दिल्ली – सुनीत शर्मा यांनी रेल्वे बोर्डाचे (रेल्वे मंत्रालय) नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि केंद्र सरकारचे पदसिद्ध प्रधान सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.
सुनीत शर्मा यांची रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करायला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली आहे. यापूर्वी सुनीत शर्मा हे पूर्व रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून काम करत होते.
सुनीत शर्मा हे 1979 मध्ये आयआयटी कानपूरमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यास करत असताना विशेष श्रेणीतील प्रशिक्षणार्थी म्हणून भारतीय रेल्वेमध्ये रुजू झाले. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवीधर असलेल्या शर्मा यांनी भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांवर 40 वर्षांहून अधिक काळ काम केले आहे.
ते मुंबईतील परळ वर्कशॉपचे मुख्य व्यवस्थापक होते, जिथे डोंगराळ रेल्वेसाठी नॅरो गेज लोकोमोटिव्ह तयार करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांनी मुंबई जवळील माथेरानच्या रेल्वेसाठी जुन्या स्टीम नॅरो गेज लोकोमोटिव्ह पुन्हा सुरु केली.
पुणे डीआरएम म्हणून त्यांनी पायाभूत सुविधा जोडण्यात मोलाचे काम केले. यामुळे परिचालन क्षमता वाढली. डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स वाराणसीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर असताना इलेक्ट्रिक इंजिन उत्पादन सुरू करण्यासाठी त्यांनी नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली डिझेलचे इलेक्ट्रिक इंजिनमध्ये रुपांतर विक्रमी वेळेत आणि जगात प्रथमच झाले.