राज्यात महिला व आवश्यक सेवेसाठी 112 क्रमांकाची नवी यंत्रणा

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

वर्धा  :- आरोग्य विभागाच्या 108  टोल फ्री क्रमांक ज्याप्रमाणे काम करतो तशीच 112 क्रमांकाची सुविधा पोलीस विभागामार्फत महिला व आवश्यक सेवेसाठी संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्धा येथे दिली. वर्धा येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात वर्धा जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थे संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

या 112 नंबरच्या यंत्रणेमध्ये महिलांची छेडखाणी, अपघात झाला तसेच इतर आवश्यक अशा सर्व सेवा या नंबरवर देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी 2500 चारचाकी गाडी, 2 हजार दुचाकी गाड्या घेण्यात येणार आणि त्यांना जीपीएसने जोडण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने 12 हजार 500 पोलीस पदे भरतीचा निर्णय घेतलेला होता, त्यासंदर्भात 5 हजार 300 पोलीस भरतीची प्रक्रिया पहिल्या टप्प्यात सुरू केलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोविडच्या काळात कोविडच्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने जनतेसाठी काही नियम केले होते. राज्यात बहुतांश जनतेने त्याचे पालन केले. मात्र काही लोकांनी नियमांचे उल्लंघन केलेले होते. यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नसलेली प्रकरणे राज्य सरकार मागे घेईल,असेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यावेळी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.