नवी दिल्ली – देशात व्हेंटिलेटरची गरज असलेले करोना रुग्ण शोधण्यासाठी एक नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे अशी माहिती सरकारच्या वतीने आज देण्यात आली.
कोविड सिव्हीरीट स्कोरच्या सहाय्याने हे सॉफ्टवेअर काम करणार असून त्यातून रुग्णाला आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज आहे किंवा कसे याचीही माहिती मिळू शकते.
या संबंधात माहिती देताना विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांना क्रिटीकल केअरची गरज नाही असे रूग्ण शोधून काढणेही यातून शक्य होणार असून त्यामुळे खऱ्या गरजू रुग्णांनाच आयसीयू बेड्स किंवा व्हेंटिलेटर्स मिळू शकतात.
निकषांच्या स्कोअरवर हे सॉफ्टवेअर काम करते. हे सॉफ्टवेअर ग्राफिकल ट्रेंडच्या आधारेही रुग्णांच्या गरजांचे मोजमाप करू शकते. हे तंत्रज्ञान सध्या कोलकाता आणि उपनगरातील तीन कोविड केअर सेंटरमध्ये वापरले जात आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी रुग्णांच्या आयसीयू बेड्स किंवा अन्य जीवरक्षक प्रणालीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. ती आयत्यावेळी मॅनेज करणे अनेक रुग्णालयांना जड गेले. त्यातून मोठाच गोंधळ उडाला होता. या प्रकारात हे सॉफ्टवेअर अत्यंत उपयोगी ठरणार आहे असा या मंत्रालयाचा दावा आहे.
कोलकात्याची फाउंडेशन फॉर इनोव्हेशन इन हेल्थ ही संस्था आणि विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचा एसईईडी विभाग यांनी संयुक्तपणे हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. हे सॉफ्टवेअर वापरता येऊ शकतील असे आरोग्य कर्मचारी तयार करण्यासाठी त्यांना स्वतंत्र प्रशिक्षणही दिले जाणार आहे.