मायदेशी परतणाऱ्यांना 14 दिवस सर्वांपासून वेगळे राहण्याचे आदेश
वूहान : कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे चीनमध्ये आतापर्यंत 1523 बळी गेले आहेत. तर 66492 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनामुळे चीनमधील नववर्षांच्या सुट्ट्यांमध्ये वाढ करण्यात आली होती. अनेक नागरिक सुट्ट्या व्यतित करण्यासाठी परदेशी होते, मात्र आता ते मायदेशी परतू पाहत आहेत, अशातच शुक्रवारी रात्री अचानक चीनमध्ये परतणाऱ्या नागरिकांसाठी बीजिंगमध्ये नवा नियम करण्यात आला आहे.
बीजिंगमध्ये परतणाऱ्या नागरिकांना 14 दिवस सर्वांपासून वेगळे ठेवण्यात येणार आहेत. परत आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झालेली नाही किंवा त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळत नाहीत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत चौदा दिवस वेगळे राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. जर कोणी हा नियम धुडकावला तर त्यास शिक्षा देण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली.
बीजिंग शहरात येणाऱ्या नागरिकाला त्याने शहराबाहेर किंवा चीनबाहेर असताना कुठे कुठे प्रवास केला याची माहिती शहरात येण्यापूर्वी इथल्या अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तशी सूचनाच नागरिकांना करण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात चीनमध्ये 2641 जणांना कोरोनाची लागण झालेली असल्याचे स्पष्ट झाले. तर दुसरीकडे या आजारातून बरे झाल्यामुळे 1373 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी एका दिवसात कोरोनामुळे 139 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फैलाव चीनमधील हुबेई प्रांत आणि त्याची राजधानी वुहानमध्ये सर्वाधिक प्रमाणात झाला आहे.