बार्टीचा निर्णय : प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना
पुणे – बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)मध्ये एम.फिल. व पीएच.डी. करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्तीशिवाय अन्य कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ अथवा अर्थार्जन करण्यासाठी अन्यत्र नोकरी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीची रक्कम तत्काळ रोखण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, शिष्यवृत्तीची रक्कमदेखील वसुल केली जाणार आहे. बार्टीचे निबंधक यादव गायकवाड यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीच्या वतीने एम.फिल. व पीएच.डी.साठी दिली जाते. या दोन पदव्यांकरिता किमान तीन वर्षांचा कालावधी ग्राह्य धरला आहे. त्याकरिता 25 ते 28 हजार रुपये प्रतिमहा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती दिली जाते. संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रबंधावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ही अधिछात्रवृत्ती दिली जाते.
बार्टीच्या नियामक मंडळाची 25 वी बैठक 29 नोव्हेंबर 2019 रोजी झाली. एम.फील. व पीएच.डी.च्या संशोधक विद्यार्थ्यांना ही छात्रवृत्ती लागू असताना केंद्र सरकारच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचादेखील लाभ दिला जातो. त्यामुळे एकाच अभ्यासकामासाठी बार्टीची अधिछात्रवृत्ती आणि केंद्र सरकारच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्याने दोन शिष्यवृत्त्या मिळत असल्याच्या बाबीला नियामक मंडळाने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, या दोन्ही शिष्यवृत्तींचा लाभ घेणाऱ्या 2012 ते 2017 या कालावधीतील संशोधक विद्यार्थ्यांची याबाबतची माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीबरोबरच संबंधित लाभार्थी या कालावधीत अर्थार्जनाकरिता खासगी, शासकीय कार्यालय अथवा अन्य कोणत्याही ठिकाणी अर्धवेळ नोकरी करत असल्यास, तो बार्टीच्या शिष्यवृत्तीस पात्र ठरत नाही. ही बाब स्पष्ट करण्यासाठी संबंधित संशोधक विद्यार्थ्याने प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे.