पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेकडून प्रभात रस्ता अर्बन स्ट्रीटअंतर्गत विकसित करण्यात आला असून, या रस्त्यावर असलेले दोन लोखंडी पथदिवे गुरुवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास कोसळले. प्रभात रस्त्याच्या सुरुवातीलाच दर्शन हाॅटेलच्या समोर हा प्रकार घडला असून, रात्रीच्या वेळी वर्दळ नसल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
मात्र, खांब कोसळल्याची माहिती नसल्याने अनेक वाहनचालक अंदाज न आल्याने या खांबाना धडकून किरकोळ जखमी झाले आहेत. हे खांब कशामुळे कोसळले हे अद्याप समोर आले नसले, तरी खांबाचा खालचा भाग गंजला असल्याने, तसेच ते बसविताना तकलादू पद्धतीने बसविण्यात आल्यानेच ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
महापालिकेकडून अवघ्या दोन ते अडीच वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले असून, आधीच लहान असलेल्या रस्त्यावर मोठे पदपथ उभारण्यात आलेले आहेत. त्यातच हे पदपथ उभारल्यानंतर महापालिकेने या रस्त्यावर नवीन पथदिवे लावले आहेत. मात्र, हे पथदिवे लावताना ते खोलपर्यंत न लावता पदपथावर लोखंडी स्ट्रक्चर करून नट-बोल्टमध्ये हे पददिवे उभारण्यात आलेले आहेत.
या पथदिव्यांसाठी वापरण्यात आलेले साहित्यही निकृष्ट दर्जाचे आहे. परिणामी, रात्रीच्या सुमारास गंजलेला पथदिव्याचा भाग तुटल्याने एक खांब कोसळला, तर या खांबावरून मोठ्या प्रमाणात खासगी कंपन्यांच्या केबल टाकण्यात आलेले असल्याने त्याचा ताण बसून दुसरा खांबही काही सेकंदात कोसळला. त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला.
मात्र, रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. हे खांब कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर मनसेचे प्रभात रस्ता शाखाध्यक्ष उदय गडकरी यांच्यासह अनिरुद्ध सूर्यवंशी, प्रसाद अभ्यंकर यांनी तत्क़ाळ महावितरण, तसेच महापालिकेस ही माहिती कळविली. त्यानंतर तत्काळ हे खांब हटविण्यात आले. मात्र, ज्या ठिकाणी हे खांब पडले, तिथे समोरच शाळा असल्याने आणि हा वर्दळीचा रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठी गर्दी असते. त्यामुळे दिवसा हा प्रकार घडला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती.
निकृष्ट कामाला जबाबदार कोण?
महापालिकेच्या पथ विभागाने हा रस्ता विकसित केला आहे, तर पथ विभागाने नागरिकांची मागणी नसताही आपल्या हौसेखातर हे पथदिवे बसविले आहेत. आता पथदिवे पडल्यानंतर याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. पडलेले पथदिवे अतिशय निकृष्ट असून, ते खालच्या बाजूस गंजलेले आहेत. महापालिकेने शहरभर असे पथदिवे बसविलेले आहेत. त्यामुळे इतर खांबांचेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.