कचरा डेपोमध्ये ओपन डम्पींग बंद असताना पालिकेकडून चेन बुलडोझरच्या निविदा
कॉंग्रेसचे नगरसेवक शिंदे यांनी केली चौकशीची मागणी
पुणे – कचरा प्रकल्पातील कॅपिंग डम्पींग आणि लॅन्डफिल कामाकरिता चेन बुलडोझरची गरज असते. याची किंमत 1.71 कोटी असताना पालिकेने मात्र गेल्या काही वर्षात ही मशीन भोडतत्त्वावर घेत संबंधी ठेकेदाराला साडे आठ कोटी पेक्षा अधिक रक्कम भाडे म्हणून अदा केले आहे. नागरिकांचा कररूपी पैसा पालिका प्रशासनाकडून कचऱ्याप्रमाणेच उधळला जात असल्याचा आरोप नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये ओपन डम्पींग बंद असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते, असे असताना डम्पींग आणि लॅन्डफिलचे काम करण्यासाठी भाडेतत्वावर चेन बुलडोझर मशिन पुरवण्याची निविदा कशा काय काढण्यात येतात? असा सवालही शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
कचरा डेपोमध्ये कॅपिंग आणि लॅन्डफिलचे काम करण्यासाठी भाडेतत्वावर चेन बुलडोझर मशिन पुरवण्यासाठी निविदा स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आली आहे. मागील चार वर्षापासून असे मशिन पुरवण्याचे काम मे. नॅशनल अर्थमूव्हर्स, याच ठेकेदारालाच ठेकेदाराला मिळत आहे, आताही संबंधित ठेकेदाराने कमी दराने निविदा भरल्याने त्यालाच काम देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
संबंधित ठेकेदाराकडून वापरली जाणारी मशिनरी ही 30 वर्षे जुनी असून प्रशासनाने मशिनची तांत्रिक कार्यक्षमता तपासली नाही. तांत्रिक कार्यक्षमतेसाठी सरकारने 15 वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे, असे असताना कालबाह्य मशिनच्या माध्यमातून काम करून घेतले जात आहे. भाडे देण्यासाठी जेवढी रक्कम खर्च झाली त्यात दोन नवीन मशिन घेतल्या असत्या तर पालिकेचे पैसे वाचले असते. मात्र, प्रशासनातील अधिकारी संबंधित ठेकेदाराशी हातमिळवणी करून गैरव्यवहार करत असल्याचा वास येत आहे, असे शिंदे यांनी सांगितले.