प्रभात वृत्तासेवा पुणे, दि. 29 – स्वाइन फ्लूच्या चाचणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दवाखाने आणि खासगी प्रॅक्टीशनर्ससाठी नवे आदेश काढले आहेत. यामध्ये ए, बी, सी स्वरूपात लक्षणांची नोंद केली असून, त्यातील सी लक्षणे असतील, तरच स्वाइन फ्लू (एच1एन1) आहे का याची चाचणी करण्याचा सल्ला रुग्णांना द्या, असे या आदेशात म्हटले आहे. महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती आणि साथरोग नियंत्रण विभाग प्रमुख तथा सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी हा आदेश काढला आहे.
सध्या स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या वाढत आहे. याशिवाय सर्वसामान्य फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लक्षणे असतील, तर त्यासाठी “एच1 एन1’ची तपासणी करण्याचा सल्ला देऊ नये, असे यामध्ये म्हटले आहे.
“ए’ कॅटॅगरीमध्ये थोडा ताप, कफ, घसा खवखणे, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब-उलटी होत असेल तर प्रयोगशाळा तपासणी करण्याची गरज नाही. यासाठी रुग्णाचे घरीच विलगीकरण करणे, औषधे घेणे आणि 24 तास देखरेखीखाली ठेवणे हा उपाय यामध्ये सांगितला आहे.
“बी’ कॅटॅगरीमध्ये जास्त ताप, घशाला जास्त इन्फेक्शन आणि नाक गळत असेल, तर त्यांची स्वॅब टेस्ट करणे आवश्यक, त्यातूनही जर ही लक्षणे तीव्र असतील तरच प्रयोगशाळेत तपासणी करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये रुग्णाला घरीच विलगीकरणात ठेवणे आणि रोगप्रतिकारक औषधे देणे हा उपाय यामध्ये सांगितला आहे.
“सी’ कॅटॅगरीमध्ये श्वास घेण्यात अडचण, छातीत दुखणे, हायपर टेन्शन, नखे दुखणे यांसारखी लक्षणे असतील, तर त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवणे आवश्यक आहे, असे यात नमूद केले आहे.