प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 29 –आधी तीनची प्रभाग रचना, त्यानंतर आता ओबीसी आणि महिला आरक्षणामुळे प्रभागात बदललेली राजकीय समीकरणे यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विद्यमान नगरसेवकांना तिकिटासाठी रस्सीखेच करावी लागणार आहे.
महापालिकेची 2017 मध्ये झालेली निवडणूक 4 सदस्यांच्या प्रभागानुसार झाली होती. त्यात दहापेक्षा अधिक प्रभागांमध्ये भाजपचे चार नगरसेवक निवडून आले होते. मात्र, आता तीनच्या प्रभागामुळे यातील एका नगरसेवकाला शेजारचा प्रभाग शोधावा लागणार होता. ही शोधाशोध सुरू असतानाच आता त्यात, ओबीसी आरक्षणाची भर पडल्याने आणि नव्याने महिला आरक्षण पडल्याने अनेक प्रभागांमध्ये नगरसेवकांना घरी बसून पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात आणावे लागणार आहे. अशा वेळी पक्ष या विद्यमानांच्या घरात तिकिट देणार, की शेजारच्या प्रभागात अतिरिक्त ठरलेल्या विद्यमान नगरसेविकेला संधी देणार याबाबत अनिश्चितता असल्याने या नगरसेवकांना धक्का बसणार आहे. त्यातच प्रभागांची रचना करताना मोठी तोडफोड झाल्याने विद्यमान आमनेसामने आहेत.
शहरात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नवीन प्रभाग 16 फर्ग्युसन कॉलेज-एरंडवणामध्ये भाजपचे दीपक पोटे, जयंत भावे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे, निलीमा खाडे, ज्योत्सना एकबोटे, मंजुश्री खर्डेकर या आठ जणांच्या प्रभागांचा समावेश आहे. मात्र, आता प्रत्यक्षात जागा तीनच असून, या प्रभागातून माजी विरोधी पक्ष नेते उज्ज्ववल केसकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय पुनीत जोशी हे सुद्धा इच्छूक आहेत. तर या प्रभागात एक जागा ओबीसी महिला आरक्षित झाली असून, एक जागा सर्वसाधारण गटात महिलेसाठी राखीव आहे. तर सर्वसाधारण गटाला एकच जागा शिल्लक आहे.
राष्ट्रवादीला आरक्षणाने तारले
ओबीसी आरक्षणामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मात्र फायदा झाल्याचे समोर आले आहे. प्रभाग 56 चैतन्यनगर-भारती विद्यापीठामध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे आणि युवराज बेलदरे समोरासमोर येत होते. या नवीन आरक्षणामुळे या प्रभागात आता पुरुषांसाठी दोन जागा झाल्या आहेत. त्यामुळे हा वाद सुटला आहे, तर धनकवडी आंबेगाव पठार येथेही राष्ट्रवादीच्या बाळासाहेब धनकवडेसाठी जागा उपलब्ध झाली आहे. या शिवाय, प्रभाग 34 कोंढवे धावडे- वारजे आणि रामनगर- उत्तमनगर शिवणेमध्ये राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दिलीप बराटे, सायली वाजंळे, सचिन दोडके, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे काही इच्छुक आमनेसामने आले होते. मात्र, या आरक्षण सोडतीमुळे या सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
प्रभाग 17 शनिवार पेठ-नवी पेठ
या प्रभागतही दोन जागा महिलांसाठी आरक्षित असून एक जागा सर्वसाधारणगटासाठी आहे. मात्र, या प्रभागात विद्यमान नगरसेविका गायत्री खडके, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, भाजप उपाध्यक्ष धनंजय जाधव, नगरसेवक राजेश येनपुरे, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, दिवंगत नगरसेवक महेश लडकत यांचे बंधू शैलेश लडकत, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर, आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक, खासदार गिरिश बापट यांची सून स्वरदा बापट अशी इच्छुकांची फौजच आहे. त्यामुळे या प्रभागातील काही विद्यमानांना प्रभाग 18 शनिवारवाडा-कसबा पेठ, तर काही जणांना प्रभाग 38 शिवदर्शन-पर्वतीमधून लढावे लागणार आहे.
प्रभाग 52 नांदेड सिटी – सनसिटी
प्रभाग 52 नांदेड सिटी-सनसिटीमध्ये दोन महिला आरक्षणे पडली असून, या ठिकाणी नगरसेविका मंजुषा नागपुरे, ज्योती गोसावी तसेच नीता दांगट या विद्यमान नगरसेविका इच्छुक आहेत. तर सर्वसाधारण गटाची एकच जागा असताना, विद्यमान नगरसेवक प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, मतदारसंघ अध्यक्ष सचिन मोरे इच्छुक आहेत. त्यामुळे, यातील काहींना प्रभाग 51 मध्ये संधी मिळाणार असली तरी त्या प्रभागातही हरिदास चरवड, राजाभाऊ लायगुडे, राजश्री नवले यांच्यासह अनेक जण निवडणुकीसाठी तयार आहेत. त्यामुळे या प्रभागातही तिकिटासाठी रस्सीखेच होणार आहे. तर प्रभाग 36 कर्वेनगरमध्येही अशीच स्थिती असून, या प्रभागात दोन महिला आरक्षणे असल्याने तसेच सर्वसाधारण गटासाठी एकच जागा असल्याने भाजपचे विद्यमान नगरसेवक सुशील मेंगडे आणि राजाभाऊ बराटे समोरासमोर येत आहेत. तर या प्रभागात भाजपने इतर काहींना पक्षात घेऊन तिकिट देण्याचा शब्दही दिला असल्याची चर्चा आहे.