स्वतःच्याच पक्षातील बंडखोरांमुळे संसदेत अपमानास्पद पराभव
लंडन: ब्रिटनच्या संसदेमध्ये पराभव झालेल्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासमोर “ब्रेक्झिट’च्या मुद्दयावरून आता स्वतःच्याच हुजूर पक्षातील खासदारांचे नवे आव्हान उभे राहिले आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये प्रश्नोत्तराच्या वेळी जॉन्सन यांनी हुजूर पक्षातील तसेच विरोधकांमधील बंडखोर खासदारांना “ब्रेक्झिट’ला मंजूरी न देण्याच्या निर्णयाविरोधात उघड उघड इशारा दिला.
जर 31 ऑक्टोबरपर्यंतच्या मुदतीच्या आगोदर “ब्रेक्झिट’बाबतच्या कराराला मंजूरी दिली गेली नाही, तर युरोपियन संघातून ब्रिटनने बाहेर पडण्याच्या औपचारिकतेला आणखी किमान तीन महिन्यंचा उशीर होऊ शकेल, असे जॉन्सन यांनी खासदारांना संगितले. हा उशीर होणे आपल्याला कधीही मान्य असणार नाही. “ब्रेक्झिट’बाबतच्या कायद्याचा मसुदा म्हणजे समर्पणाचे विधेयक आहे, असेही ते म्हणाले. कायद्यानुसार “नो डील ब्रेक्सिट’ला रोखण्यासाठी खासदारांनी आपल्याविरोधात दुसऱ्यांदा मतदान केल्यास आपल्याला 15 ऑक्टोबर ऐवजी आगोदरच निवडणुका घ्यायच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
31 ऑक्टोबरला विभक्त होण्याच्या कराराबरोबर किंवा त्याशिवाय ब्रिटनला युरोपिय संघामधून बाहेर घेण्याच्या आपल्या धमकीमुळे सरतेशेवटी युरोपिय संघातील अन्य 27 नेत्यांना अधिक चांगल्या अटींवर सहमत करून घेण्यास भाग पाडले जाऊ शकेल, असे जॉन्सन यांचे म्हणणे आहे. मात्र अशा प्रकारे युरोपिय संघातून बाहेर पडण्याने जवळपास अर्धा शतकाचे ब्रिटनचे संबंध संपुष्टात येतील. त्यामुळे जॉन्सन हे आगीशी खेळत आहेत, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
“ब्रेक्झिटचा “नो-डील’ करण्याचा धोका वाढला आहे आणि सध्याच्या माघारीला पर्याय नाही, अशा शब्दात युरोपियन कमिशननेही बुधवारी निर्वाणीचा इशारा दिला आहे. मंगळवारी संसदेमध्ये बंडखोर हुजूर पक्षाच्या बंडखोर खासदारांनी करार रद्द केल्याच्या विरोधात मतदान केले आणि विरोधी पक्षातील खासदारांमध्ये प्रवेश केला. यामुळे जॉन्सन यांना अत्यंत अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला होता.