मुंबई – सलमान आणि कतरिना कैफच्या बहुचर्चित ‘टायगर 3’ चे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची चर्चा सर्वत्र आहे. टायगर एक आणि दोन सुपरहिट ठरल्यामुळे याच्या तिसऱ्या पार्टची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री रिद्धी डोगरा देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
‘सलमानने दिवाळी २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केल्यानंतर, मनीष शर्माच्या ‘टायगर 3’ बद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्साह आहे. ‘टायगर 3’ ची कास्टिंग खूप तगडी आहे. यानिमित्ताने सलमान-कतरिना ही फेमस जोडी मोठ्या पडद्यावर पुन्हा सोबत दिसणार आहे. तसेच इम्रान हाश्मीसह ‘टायगर 3’च्या कलाकारांमध्ये टेलिव्हिजनमधील लोकप्रिय चेहरा असलेली रिद्धी डोगरा देखील झळकणार आहे.’असुर’मुळे रिद्धी डोगरा चांगलीच चर्चेत आली होती.
रिद्धी डोग्रा ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने ‘असुर: वेलकम टू युवर डार्क साइड’ आणि ‘द मॅरीड वुमन’या अनेक कलाकृतींमध्ये अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय, तिने काही लोकप्रिय डेली सोप्समध्येही काम केले आहे. टायगर ३ च्या निमित्ताने तिचा नवा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.