नेवासा – आई…मराठा आरक्षणासाठी ( Maratha Reservation) मी बलिदान देत असल्याचा व्हाॅटस्अॅपवर मॅसेज करुन युवकाने प्रवरासंगम येथील गोदावरी पुलावरुन नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगर येथील महेश उर्फ ओम मोहन मोरे या युवकाने मंगळवार (दि.12) रोजी रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर – अहमदनगर महामार्गावरील कायगांव टोका येथील गोदावरी नदीच्या पुलावर मोटारसायकल लावून नदीत उडी घेत आत्महत्या केली.
व्हाट्सअॅपवर मेसेज पाठवला –
आत्महत्येपूर्वी महेशने आईला मोबाईलवरुन मेसेज पाठवला होता. त्यामध्ये लिहिले की, मिस यु आई, जय व पप्पा मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे. समाजासाठी एक जीव माझा पण. जय तु आईसोबत कायम रहा.. माझा मम्मी मध्ये खुप जीव आहे. पुढे चांगली जिंदगी जगा. आय लव्ह मम्मी असा मॅसेज आईच्या मोबाईलवर टाकून गोदावरी नदीच्या पुलावरून मराठा आरक्षणासाठी महेश मोरे या युवकाने उडी मारून आत्महत्या केली.
सदर तरुणाचा मृतदेह बुधवार (दि.13) रोजी दुपारी 12 वाजता गोदावरी नदीपात्रात शोध मोहिमेनंतर सापडला. त्यानंतर नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.
नेवासा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक एस.जी. ससाणे, पो.हे.कॉ.बर्डे, माने, राम वैद्य, अरविंद वैद्य, मुकिंदपुरचे सरपंच सतीश निपुंगे, राजेंद्र उंदरे, भाऊसाहेब वाघ आदी मराठा समाजाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी याआधीही काही जणांनी आत्महत्या केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, राज्य सरकार वेळोवेळी आत्महत्या करू नका असे आवाहन केले आहे.