चंडिगढ –पाकिस्तानस्थित दहशतवादी मॉड्युलशी संबंधित तिघांना पंजाबमध्ये अटक करण्यात आली. त्यामुळे टार्गेट किलिंगचा नापाक डाव उधळला गेल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. विश्वासार्ह माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तीन संशयितांना अटक केली. त्यांच्याकडे पिस्तुल आणि जिवंत काडतुसांचा साठा सापडला. तो साठा मध्यप्रदेशातून आणला गेला होता.
पंजाबमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण करण्यासाठी टार्गेट किलिंग घडवण्याची जबाबदारी अटक करण्यात आलेल्यांवर सोपवण्यात आली होती. आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे नियंत्रण असणाऱ्या दहशतवादी मॉड्युलशी त्यांचे लागेबांधे असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले. संबंधित प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची आणि अधिक शस्त्रसाठा सापडण्याची शक्यता आहे.