कांदा महागला ही नोकरवर्गाची ओरड चुकीची

नगर  – नगर बाजार समितीच्या नेप्ती बाजारात दोन दिवसआधी झालेल्या लिलावात कांद्याला दीडशे रुपये भाव मिळाला. गेल्या आठ दहा दिवसापासून कांदा महाग झाला आणि कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, गृहिणींवर संक्रात आल्याची अशी ओरड सुरू आहे. माध्यमे या महागाईचा आगडोंब उभा करत असल्याचे चित्र आहे. भाववाढीची ही ओरड सर्वसामान्य माणसाची नसून शेतीशी काडीचाही संबध नसलेल्या नोकरशाह वर्गाची आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया शेतकऱ्यांची आहे.

आज कांदा 50 रुपयावरून सव्वाशे ते दिडशेपर्यंत पोहोचला. आता कांदा थेट दोनशेकडे झेपावतोय. मात्र, परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात कांदा सडून गेला, कांद्याची वाढ थांबली. परिणामी कांद्याच्या वजनात घट झाली. शेतकऱ्याला एकरी 80 ते 100 क्विंटल उत्पादन अपेक्षित असतांना त्या शेतकऱ्याला आज एकरी फक्त 8 ते 10 क्विंटल उत्पादन मिळाले.

कांद्याची आवक घटल्यामुळे कांद्याचे भाव वाढले,मात्र; शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला का, याचा विचार कांद्याचे भाव वाढले म्हणून ओरड करणारा पांढरपेशा वर्ग करत नाही. मागील काही महिन्यांपासून कांद्याची आवक कमी असून दर वाढत आहेत. वर्षा-दोन वर्षातून कधीतरी कांद्याला चांगला भाव मिळतो. एरवी मातीमोल भावाने शेतकऱ्याला कांदा विकावा लागतो. खूपदा शेतकऱ्याचा लागवडीचा खर्च देखील निघत नाही.

कांद्याला दोन रुपये किलोच्या पूढे कोणी कांद्याला विचारत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल होतो. कृषी उत्पन्न बाजार समितीतून कांदा परत घरी नेणं शक्‍य नसल्याने कांदा उत्पादक कांदा रस्त्यावर फेकून देतो. त्यावेळी मात्र शेतकऱ्यांची कुणालाही थोडीशी कणव येत नाही. शेतकऱ्यांच्या श्रमाची कुणाला जाणीव होत नाही. मात्र कधी कांदा वधारला तर लगेच महागाई वाढली, अशी ओरड सुरू होते. सरकारही कांद्याच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी कांदा आयात करते. याचाही फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. कांदा महागला असला तरी ही भाववाढ दिर्घकाल राहणार नाही.

मागच्या पाच वर्षात सगळ्याच गोष्टीचे भाव वाढले. गॅस, पेट्‍रोल – डिझेल, किराणा, यात सातत्याने वाढ होत आहे. सोने-चांदी यांचे भाव गगनाला भिडले. मावा- गुटख्याचे भाव तिपटीने वाढले. मोबाईल रिचार्जचे दरही दुप्पटीने वाढलेत. मात्र या भाव वाढीबद्दल कुणी काही बोलत नाही. या भाव वाढीवरून नाही कुणाचे बजेट कोलमडले ! फक्त शेतकऱ्याच्या शेतमालाला जरा भाव वाढून भेटला, की लगेच कोलमडले यांचं बजेट ! शेतकरी जे पिकवतो, ते सगळं फुकट हवंय यांना !
केतन येवले शेतकरी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)