हडपसर (विवेकानंद काटमोरे) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पुणे शहर कार्यकारिणी गुरुवारी जाहीर करण्यात आली असून, त्यात हडपसरला झुकते माप देण्यात आले आहे. पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी म्हणून माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी उपमहापौर निलेश मगर यांची, तर विधानसभा अध्यक्षपदी डॉ.शंतनु जगदाळे यांची तसेच प्रवक्तेपदी नगरसेवक योगेश ससाणे ययांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच आमदार चेतन तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असून नव्याने महापालिकेत आलेली गावेही राष्ट्रवादी पूरक असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत हडपसर विधानसभा मतदार संघाला झुकते माप देण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. अनेक माजी नगरसेवक ,पंचायत समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनाही शहर कार्यकारणीत समावून घेतले आहे.आगामी विधानसभा व महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हडपसरला झुकते माप देण्याबरोबरच विभागवार समतोल राखण्याचा प्रयत्नही केल्याचे दिसत आहे.
माजी नगरसेवक फारूक इनामदार,प्रशांत म्हस्के,माजी नगरसेविका विजया कापरे,शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा वासंती काकडे तसेच हवेली पंचायत समितीचे संदीप तुपे, जतिन कांबळे, राहुल घुले यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच सरचिटणीसपदी राजेंद्र गारूडकर, उदयसिंह मुळीक, संजय लोणकर, शालिनी जगताप,रईस सुंडके, संजय गायकवाड, रामभाऊ कसबे ,राजेश आरणे यांची वर्णी लागली आहे.तर संजय बबन घुले, प्रशांत घुले, योगेंद्र गायकवाड, दत्ता शिंदे राहुल होले आणि संकेत कवडे यांना शहर चिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शहराचे संघटक सचिव यापदी प्रदिप मगर, निलेश घुले, संजय शिंदे, महेश सातव,अन्वर शेख,सुशीला गुंजाळ व हेमंत बधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हडपसर विधानसभेत कार्याध्यक्ष म्हणून संदीप बधे व अमर तुपे यांची निवड केली आहे.याशिवाय सेवादल अध्यक्षपदी येथील योगेश जगताप यांची ,तर कार्यकारिणी सदस्य मोहमद्दीन खान, सागरराजे भोसले ,गणेश भोईटे यांची नियुक्ती केली आहे.शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज जाहीर केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर कार्यकारणीत हडपसर मतदार संघातील या पदाधिकारयांचा समावेश करण्यात आला आहे.
“पुणे शहरातील आठही मतदार संघात तुलनेने हडपसर विधानसभा मतदार संघ विस्तृत आणि मोठा आहे. याशिवाय या मतदारसंघात खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार चेतन तुपे प्रतिनिधित्व करत आहेत. तशी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची संख्याही अधिक आहे. त्यातूनही अधिकाधिक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत येथून सर्वाधिक नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राहतील यासाठी ही कार्यकारणी महत्वाची ठरणार आहे.”
– प्रशांत जगताप
शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.