कुरवली – इंदापूर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागले होते. तालुक्यातील पश्चिम भागातील नदीकाठच्या तावशी, उद्घट, जांब, मानकरवाडी, घोलपवाडी, कुरवली, चिखली, कळंब भागात भाजप व राष्ट्रवादीचे डझनभर प्रमुख पुढारी आहेत.
दोन्ही पक्षाच्या पुढाऱ्यांनी तालुक्यात ठाण मांडले होते. कळंब येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे योगेश डोंबाळे मित्र परिवार यांनी उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या विजयाच्या घोषणा देत गुलाल उधळून फटाके वाजवून आनंद साजरा केला.
इंदापुरात मतमोजणीच्या सुरुवातीला भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. त्यानंतर काही फेरीतच राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी आघाडी घेत 23 हजारांचे लीड घेतल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. गुलाल उधळून फटाके वाजवून आनंद साजरा केला. उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांना जल्लोष केला.
भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा, लाखेवाडी गटातील मतमोजणी सुरू झाल्यानंतर पाटील यांनी मताधिक्य घेत भरणे यांचे 23 हजारांचे लीड अवघ्या 3200 वर आणून ठेवले. पाटील की भरणे बाजी मारणार? याचा अंदाज कार्यकर्ते घेत असतानाच भरणे यांनी आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांनी फटाके वाजविण्यास सुरूवात केली.