माजी आमदार विजय औटी, सुजित झावरे यांना लागोपाठ दुसरा धक्का!
पारनेर – पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी व सुजित झावरे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र हा ठराव पास करण्यावेळी सर्व संचालक अनुपस्थित राहिल्यामुळे हा प्रस्ताव बारगळला. त्यामुळे माजी आ. विजय औटी व सुजित झावरे यांना धक्का बसला आहे.
यादरम्यान सभापती गायकवाड यांनी काही संचालक आपल्या सोबत ठेवले, तर काही संचालक गैरहजर राहिल्याने ठराव बारगळला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर दुसऱ्या दिवशी हा ठराव बारगळल्याने माजी आमदार विजय औटी व सुजित झावरे यांना हा धक्का मानला जात आहे. तसेच दुसऱ्यांदा हा ठराव गायकवाड यांनी परतवून लावला आहे. संचालक शिवाजी बेलकर, सावकार बुचुडे, अण्णा बढे, जयश्री शिंदे, संगीता कावरे हे संचालक आपल्यासोबत आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.
जे विरोधात गेले होते, ते देखील दबावापोटी गेले होते. मात्र ते देखील सोबत आहेत, असे यावेळी गायकवाड यांनी सांगितले. विधानसभेचा निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अविश्वास ठराव असल्यामुळे याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे विरोधक धास्तावलेले असल्याने त्यांनी या अविश्वास ठरावाकडे पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे.
अविश्वास ठराव निश्प्रभ करण्यासाठी आ. नीलेश लंके व जिल्हा बॅंकेचे संचालक उदय शेळके यांनी निर्णाय भूमिका घेतली. शेतकरी हिताच्या निर्णयासाठी सर्वजण बरोबर असून, जे संचालक त्यांच्याबरोबर होते ते बळजबरीने त्यांच्यासोबत आहेत. मात्र यापुढे देखील शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात येतील. ज्यांनी अविश्वास ठराव आणला होता, त्यांनी देखील यापुढे अशा प्रकारचे कृत्य करू नये. तालुक्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे गैरकृत्ये करणाऱ्याला जनता धडा शिकवत असते.
प्रशांत गायकवाड सभापती, बाजार समिती