राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला
मुंबई : चार वेळा आमदार असूनही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजलगाव येथील नाराज आमदार प्रकाश सोळंके यांची समजूत काढण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना यश आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पक्षात सन्मानाने काम करण्याची संधी मिळणार असल्याने राजीनामा मागे घेत असल्याचे प्रकाश सोळंके यांनी सांगितले.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदावर वर्णी न लागल्याने माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली होती. सोळंके हे आतापर्यंत चारवेळा आमदार म्हणून निवडूण आले आहेत. त्यांच्या नाराजी नाट्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती.
त्यांना तातडीने मंगळवारी मुंबईत बोलावून घेण्यात आले. आज त्यांची बेलार्ड पीअर येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीदरम्यान सोळंके यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही फोनवरून चर्चा केली.
याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रकाश सोळंके यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मुंबईत पाचारण करण्यात आल्याचे सांगितले. तर अजित पवार म्हणाले, मंत्रिमंडळात प्रत्येकालाच स्थान मिळावं असं वाटणं काही गैर नाही. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मोठ कुटुंब आहे.
या कुटुंबातील प्रत्येक कार्यकत्र्यांचा सन्मान ठेवणं, प्रत्येकाला योग्य त्या जबादारीने काम करायला देणं, ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कायमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही जी चर्चा केली त्यातून प्रकाश दादांचं समाधान झालं आहे, असे अजित पवार म्हणाले.
घरातली चर्चा वेशीवर टांगायची नसते
घरातली चर्चा सगळीकडे वेशीवर टांगायची नसते. त्यामुळे वडीलकीच्या नात्याने पवार साहेबांनी चार गोष्टी सांगितल्या. कधी कधी आम्ही लोक हट्टपणा करत असतो. पण तो हट्ट कुठपर्यंत ताणायचा यालाही काही मर्यादा असतात. त्या पद्धतीने एक सकारात्मक दृष्टीकोन प्रकाश सोळंके यांनी घेतल्याचे अजित पवार म्हणाले.
सन्मानाने पक्षात काम करणार – प्रकाश सोळंकी
माझी आमदारकीची चौथी टर्म असल्याने पक्षाने न्याय द्यावा ही माझी अपेक्षा होती. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी निर्माण झाली. राजकारणातून निवृत्ती घ्यायची आणि आमादारकीचा राजीनामा द्यायचा या विचारात हातो.
पण मतदारसंघातील कार्यकत्र्यांनी घाईने निर्णय घेऊ नका असे सांगितले. मी पक्षाला कुठलंही मंत्रीपद नकोय मला सन्मानाने काम करण्याची संधी द्या असे सांगितले आहे. पवारसाहेबांशी फोनवरून झालेल्या चर्चेनंतर त्यांच्या आदेशानुसार माझा राजीनामा मागे घेत आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश सोळंके यांनी दिली.