नगर (प्रतिनिधी) – पेट्रोल, डीझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारच्या विरोधात आज नगरमध्ये निदर्शने करण्यात आली. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी बसस्थानक चौकातील पेट्रोल पंपावरील मशिनला चपलांचा हार घातला.
आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेश्मा आठरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष गजानन भांडवलकर, वैभव ढाकणे, युवती आघाडीच्या अध्यक्षा अंजली आव्हाड, साधना बोरुडे, नगरसेवक समद खान, अमोल गाडे, प्रकाश भागानगरे, अजिंक्य बोरकर, विनित पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, आरिफ शेख, भिंगारच्या युवक आघाडीचे शहर संघटक मतीन सय्यद, गजेंद्र दांगट, विपुल वाखुरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
पेट्रोल, डीझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीने सामान्य माणसाचे अर्थकारण कोलमडले आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निम्म्यापेक्षा कमी झाल्या, त्यावेळी पेट्रोल-डीझेलचे बाजारभाव निम्म्यावर येणे अपेक्षित होते.
परंतु केंद्र सरकारने त्यावर 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर लावून स्वस्त झालेल्या पेट्रोल-डीझेलचा भाव देशातील जनतेला मिळवून दिला नाही. इंधनाचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने भूमिका घ्यायला हवी होती.
वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. अशावेळी तरी केंद्राने योग्य भूमिका घ्यायला हवी होती. मात्र, त्याकडेही नाकर्त्या सरकारने डोळेझाक केल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केल्या. शहर-जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांनीही सरकारवर टीका केली.