पुणे – राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केल्याचे पडसाद पुण्यातही उमटले असून, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या निर्णयाला विरोध दर्शवित सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. तर शहरातील पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी पक्ष कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत “साहेब.. हात जोडतो राजीनामा परत घ्या’ अशा घोषणा देत राजीनामा मागे घेण्याची विनंती पवार यांना केली आहे. यावेळी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
खासदार पवार यांनी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये “लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही निवृत्तीची घोषणा केली. घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचे पडसाद पुण्यातही उमटल्याचे पहायला मिळाले. या निर्णयानंतर, शहराध्यक्ष जगताप यांनी सामूहिक राजीनाम्याचे सूतोवाच केले.
शहराध्यक्षांचे ट्विट
“कितीही इच्छा झाली तरी किमान भक्तांच्या श्रद्धेसाठी देवाला देवपण सोडता येत नाही, अगदी तसंच पवार साहेबांनीही अध्यक्षपद सोडू नये. साहेबांनी आपली भूमिका न बदलल्यास माझ्यासह पुणे शहर कार्यकारणीतील तमाम सदस्य राजीनामा देत आहोत, जिथे आमचा देव नाही तिथे आमचा नमस्कारही नाही,’ असे ट्वीट राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.