- चिरीमिरीवर विकले जाऊ नका; विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचेही काढले वाभाडे
पिंपरी – अवघ्या 25 लाख रुपयांच्या मूर्ती खरेदी प्रकरणावरून पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीची सत्ता गेली. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार भाजपाचे सत्ताधारी करत असताना विरोधी पक्षनेत्यांसह पक्षाचे सर्वच नगरसेवक मात्र सत्ताधाऱ्यांच्या सूरात सूर मिसळून सेटिंगमध्ये व्यस्त आहेत. असा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांना अत्यंत गंभीर शब्दात खडे बोल सुनावले. अजित पवारांनी कोणाचीच तमा न बाळगता केलेल्या फटकेबाजीमुळे शहरातील पदाधिकारी चांगलेच घायाळ झाले.
सत्ताधाऱ्यांकडून महापालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार आणि 2022 मध्ये होऊ घातलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांची बैठक आज (शुक्रवारी) पुण्यात पार पडली. पिंपरी-चिंचवड शहरासंदर्भात झालेल्या बैठकीस पहिल्यांदाच पार्थ पवार यांनी हजेरी लावली. या बैठकीला आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यासह भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, वैशाली काळभोर, संजय वाबळे, पंकज भालेकर, शाम लांडे आदी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
कोण काय करतो, सर्व माहीत आहे
उपस्थितांना बोलताना अजित पवार म्हणाले, एवढी विकासकामे केल्यानंतर केवळ 25 लाख रुपयांच्या मूर्ती खरेदी विषयावरून पक्षाची प्रतिमा भ्रष्टाचारी करण्यात तत्कालीन भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी यशस्वी ठरले. सध्या कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक अथवा पदाधिकारी विरोध करताना दिसून येत नाही.
सभागृहातही कोणीच विरोध करत नाही. चिरीमिरी घेऊन सेंटींग करण्यातच धन्यता मानली जात आहे. कोण काय करतो हे मला सर्व माहिती आहे. टक्केवारी आणि टेंडरमध्ये सुरू असलेला प्रकार तात्काळ थांबवा, अन्यथा मला निर्णय घ्यावे लागतील.
असले उद्योग खपवून घेणार नाही
महापालिका निवडणुकीमध्ये कसल्याही परिस्थिती राष्ट्रवादीची सत्ता आली पाहिजे. त्यादृष्टीने कामाला लागा. भाजपाचा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडताना आक्रमक भूमिका घ्या. सर्वांनी एकत्रितपणे भाजपाचा चुकीचा कारभार चव्हाट्यावर मांडा, अशा सूचना करतानाच विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचेही चांगलेच वाभाडे काढले. विरोधी पक्षनेता म्हणून काय करता? असा प्रश्न अजित पवारांनी राजू मिसाळ यांना विचारला. कोण कोठे बसते, कोण काय सेटींग करतो, चिरीमिरीसाठी काय सुरू आहे, सर्व प्रकार आपणाला माहिती असून असले उद्योग खपवून घेणार नसल्याचेही पवार यावेळी म्हणाल्याने सर्वजणच अवाक् झाले. आजपर्यंत आपल्या बोलीने विरोधकांना घायाळ करणाऱ्या अजित पवारांनी स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनाच खडे बोल सुनावल्याने आज स्वकीयांनाच घायाळ होण्याची वेळ आली.
स्थायी समितीमध्ये काय करता?
सर्व विषयांना स्थायी समितीमध्येच मान्यता मिळते. या समितीमध्ये आपल्या पक्षाचे नगरसेवक आहेत ते काय करतात? असा प्रश्नही अजित पवार यांनी यावेळी विचारला. स्थायीमध्ये चुकीच्या कामांना विरोध का केला जात नाही, असे विचारतानाच यापुढे चुकीच्या कामांना विरोध करा, अशा सूचनाही पवारांनी यावेळी केल्या.
दोनचा प्रभाग, संख्या वाढण्याची शक्यता कमी
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी दोन सदस्यीय वॉर्ड रचना होणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. तर सन 2011 च्या जनगणनेनुसारच वॉर्डरचना होणार असल्याने मतदारांची संख्या वाढली तरी नगरसेवकांची संख्या वाढणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.