NCP MLA Disqualification – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला. निकाल देताना नार्वेकर यांनी, विधिमंडळ पक्षातील बहुमताचा आधार घेतला. विधिमंडळामध्ये बहुमत अजित पवार यांच्याकडे असल्याचा उल्लेख करत विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा गट हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं स्पष्ट केलं.
अजित पवार गटाचे आमदारही त्यांनी यावेळी पात्र असल्याचा निर्वाळा केला आहे. निकालापूर्वीच शरद पवार गटातील नेत्यांच्या प्रतिक्रियांवरून विधानसभा अध्यक्षांचा निकाल त्यांच्यासाठी अपेक्षितचं होता असं म्हणावं लागेल.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. अशातच आता विधानसभा अध्यक्षांचा निकालही विरोधात गेल्याने, याविरोधातही न्यायालयीन लढाई लढली जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दादा अन् साहेब दोन्ही गटाचे आमदार पात्र | NCP MLA Disqualification
विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देताना, शिवसेना निकालाची पुनरावृत्ती केली आहे. अजित पवार व शरद पवार दोन्ही गटाचे आमदार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी पात्र ठरवले आहेत.
मूळ पक्ष अजित पवार यांचाच
विधानसभा अध्यक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निर्णय देताना, जून २०२३ पर्यंत शरद पवार हेच नेते होते. यानंतर पक्षामध्ये अंतर्गत कलह निर्माण झाले. विधिमंडळ पक्षाचे बहुमत अजित पवार यांच्याकडे आहे, अशी निरीक्षणे नोंदवत मूळ पक्षाची माळ अजित पवार यांच्या गळ्यामध्ये टाकली.
शरद पवार गटाला आधीच निकालाची चाहूल? | NCP MLA Disqualification
विधानसभा अध्यक्षांच्या निकालाबाबत शरद पवार गटामध्ये सुरुवातीपासूनच उदासीनता होती. विधानसभा अध्यक्षांनी जे शिवसेनेच्याबाबतीमध्ये केलं तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्याबाबतही करणार असल्याचा अंदाज पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी वर्तवला होता.
आता निकाल सर्वोच्च न्यायालयात | NCP MLA Disqualification
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणमध्ये निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निकालांबाबत त्यांना चौकात घालून दिली होती. ठाकरे गटाकडून यापूर्वीच नार्वेकर यांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत बसणारा नसल्याचा आरोप करत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
अशातच शरद पवार गटाबाबत असाच निकाल लागल्याने, ठाकरे व पवार यांचा फैसला आता सर्वोच्च न्यायालयातच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.