वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील प्रस्तावित वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प सरकारच्या दुर्लक्षामुळे गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ गुरूवारी (दि.15) मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिला तालुकाध्यक्षा दिपाली गराडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
हा निषेध मोर्चा वडगाव शहरातील पोटोबा महाराज मंदिरापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात निदर्शनाचे फलक घेऊन, “पन्नास खोके,एकदम ओके, पन्नास खोके महाराष्ट्रतील युवकांना धोके’, अशा घोषणा दिल्या. यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत आणण्याचे मागणीचे निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, दीड लाख कोटींची गुंतणूक करणारा वेदांता-फॉक्सकॉन सरखा प्रकल्प मावळातून गेला हे दुर्दैव आहे. हा प्रश्न फक्त मावळपुरता किंवा पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. यामुळे हा प्रकल्प पुन्हा मावळात आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे या संदर्भात पुढील काळात होणाऱ्या आंदोलनात एक संघटना म्हणून खंबीरपणे प्रतिकार करा.
रविकांत वरपे म्हणाले की, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात निर्माण होणारा रोजगार राज्य सरकारने गुजरातला पाठविला आहे. हे महाराष्ट्रातील गरीब, कामगार, शेतकऱ्यांचे सरकार नसून गुजरातच्या जनतेचे सरकार आहे. गणेश खांडगे म्हणाले, मावळ तालुक्याचे देशाच्या व राज्याच्या विकासात मोलाचे योगदान आहे. यामुळे सरकारने येथील युवकांच्या हक्काचा रोजगार हिरावून घेऊन मावळ तालुक्यावर अन्याय करू नये.