पिंपरी – स्थायी समितीवरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. महापालिकेतील सत्ताधारी भाजप भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत पिंपरी चौकात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. तसेच त्यानंतर महापालिकेवर धडक मोर्चा काढत स्थायी समिती बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली. स्थायी समिती बरखास्त करा, “नही चलेगी नही चलेगी, टक्केवारी नही चलेगी’ अशा घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका परिसर दणाणून सोडला.
आठवड्याभरापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या कार्यालयावर मागील बुधवारी (दि. 18) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. त्यामध्ये स्थायी समिती अध्यक्षांसह पाच जणांना अटक केली. त्यानंतर महापालिकेतील विरोधी पक्षाने सत्ताधारी भाजप भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत स्थायी समिती बरखास्त करण्याची मागणी केली. यासाठीच आज राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये पोतदार, नंदीबैल, वासुदेव, गोंधळी सहभागी झाले होते. त्यानंतर महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, महिला आघाडी शहराध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, प्रवक्ते फझल शेख, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर आज (बुधवारी) महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आज आंदोलन करण्यात आले.