maoists attack – छत्तीसगडमधील सुकमा-विजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील टेकलगुडेम गावातील सीआरपीएफ कॅम्पवर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले, तर 14 जवान जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे हल्ल्याची माहिती मिळताच फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी परिसराची नाकेबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज 30 जानेवारी रोजी सुकमा पोलीस स्टेशन जगरगुंडा परिसरात नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि परिसरातील लोकांना मदत करण्यासाठी सुरक्षा शिबिर लावण्यात आले होते. शिबिरानंतर सीआरपीएफचे कोब्रा सैनिक जोनागुडा-अलिगुडा परिसरात शोध मोहीम राबवत होते. यावेळी माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला.
सुरक्षा दलांनीही माओवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलांचा वाढता दबाव पाहून माओवादी जंगलाच्या आडून पळून गेले. मात्र, या चकमकीत गोळी लागल्याने 3 जवान शहीद झाले. आणि 14 जवान जखमी झाले. जखमी जवानांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी रायपूरला पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी नक्षलवादी हल्ला झाला होता. 13 डिसेंबर 2023 रोजी नक्षलवाद्यांनी नारायणपूरमध्ये IED स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला, तर दुसरा जखमी झाला. राजधानीत आयोजित एका कार्यक्रमात विष्णुदेव साई मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असतानाच नारायणपूरमध्ये हा हल्ला झाला होता.
नारायणपूरच्या अमदई खाणीत नक्षलवाद्यांनी आयईडी पेरली होती. CAF 9व्या BN बटालियनच्या जवानांना याचा फटका बसला. या हल्ल्यात सीएएफ कॉन्स्टेबल कमलेश साहू शहीद झाले, तर कॉन्स्टेबल विनय कुमार साहू जखमी झाले.