रायपूर – छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या “आयईडी’च्या स्फोटामध्ये “सीआरपीएफा’च्या कोब्रा कमांडो युनिटचा एक अधिकारी शहीद झाला. तर 9 कमांडो जखमी झाले, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी आज सांगितले.
सुकमा जिल्ह्यातील चिंतालनार जंगलाच्या परिसरात शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा “आयईडी’चा स्फोट झाला. या स्फोटात जखमी झालेल्या कमांडोंना मध्यरात्रीच्या सुमरास हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून घटनास्थळावरून बाहेर आणण्यात आले.
या स्फोटामध्ये जखमी झालेले कोब्रा युनिटचे असिस्तंट कमांडंट नितीन भालेराव (वय 33) यांचे आज सकाळी निधन झाले. या पथकातील 9 कमांडो आणि या पथकाचे नेतृत्व करणाऱ्य सेकंड रॅंक ऑफिसरही या स्फोटात जखमी झाले.
यापैकी 7 कमांडोंवर रायपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोघांवर दक्षिण बस्तर भागातील चिंतलनार येथील “सीआरपीएफ’च्या रुग्णालयात उपचार सुरू अहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
जखमी झालेले कमांडो “कमांडो बटालियन फॉर रिसोल्युट ऍक्शन’ अर्थात “कोब्रा’ युनिटच्या 206 बटालियनचे सदस्य आहेत. “कोब्रा’ कमांडोंचे पथक आणि स्थानिक पोलिसंचे संयुक्त पथक नियमित गस्तीवर असताना हा स्फोट झाला.