इस्लामाबाद -पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज यांना करोनाची बाधा झाली आहे. करोनाची लागण झालेल्या राजकीय नेत्यांच्या संख्येत भर पडत असल्याने पाकिस्तानमधील करोना संकट आणखी गहिरे बनल्याचे स्पष्ट होत आहे.
शाहबाज हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत. त्याशिवाय, शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) या पक्षाचे अध्यक्षपदही तेच सांभाळत आहेत. शाहबाज यांना करोना संसर्ग झाल्याने पाकिस्तानमधील आरोग्य यंत्रणेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत. याआधी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी आणि विद्यमान रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांना करोनाची बाधा झाली.
त्याशिवाय, पाकिस्तानमधील चार आमदारांचा करोनाने बळी घेतला. त्यामुळे करोना फैलावाशी झुंजण्यात पाकिस्तानमधील आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानातील करोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजारांच्या घरात पोहचली आहे. तो देश बाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानी आहे. त्या देशात करोनाने 2 हजार 300 हून अधिक बाधितांचा बळी घेतला आहे.