नवी दिल्ली: कोविड-19 च्या विरोधात लढाईत संभाव्य धोके ओळखण्यासाठी आणि पुढील संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे त्याच्या आकडेवारीचा पूर्णपणे वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी आरोग्य सेतु ऍपचा व्यापक वापर आवश्यक आहे. अशी सूचना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची आरोग्य सेतु ऍप टीम आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि एनआयसीचे डीआयओ यांच्यादरम्यान काल व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली.
आरोग्य सेतू व्यासपीठाद्वारे उपलब्ध आकडेवारीचे विश्लेषण राज्यातील रोगाच्या संक्रमणाच्या गतिशीलतेबद्दल सूक्ष्म आणि अति-सूक्ष्म दोन्ही गोष्टी समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. या आकडेवारीचा प्रभावी आणि वेळेवर उपयोग केल्यास हॉटस्पॉट विकसित होण्याआधीच त्यांच्यावर आळा घालण्यामध्ये आणि नियोजित व लक्ष्यीत पद्धतीने आरोग्य पायाभूत सुविधांचे वाटप आणि वेळेवर त्यात वृद्धी करण्यासाठी ही आकडेवारी महत्त्वपूर्ण ठरू शकते, असेही धोत्रे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात कोविड संकटावर मात करण्यासाठी आरोग्य सेतु डेटा वापरताना त्यांना आलेले अनुभव सांगितले. आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी आणि क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे धोत्रे यांनी कौतुक केले. केंद्र सरकारचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय, आरोग्य सेतु आकडेवारीच्या विश्लेषणात्मक योग्य वापराच्या दृष्टीने क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना पुढील प्रशिक्षण देण्यासाठी तातडीने मदत करेल, असे आश्वासन त्यांनी राज्य सरकारला दिले.