निसर्गवाचन

म्हातारी खोडं, त्यांचा उपयोग तो काय?, ही हेटाळणी मनुष्य जातीतल्या म्हाताऱ्यांच्या वाट्याला येणे तशी क्रूर गोष्टच आहे, पण येते खरी ती त्यांच्या वाटेला; परंतु शब्दशः झाडांच्या म्हाताऱ्या खोडांना आणि ती स्वतःहून निखळून पडेपर्यंत त्या त्या झाडांना सुद्धा त्यांचा काही त्रास नसतो. उलट, काही पक्षी तर त्या म्हाताऱ्या खोडांमध्ये घर बांधून नवीन पिढी जन्माला घालण्यासाठी त्यांचा वापर करतात.

तांबट सावरीच्या म्हाताऱ्या खोडावर अनेक पिढ्या राहिला. तिचा कापूस दरवर्षी उडून जात असे आणि त्याच दरम्यान ह्याच्या कित्येक पिढ्यासुद्धा कापसासारख्या उडून जात असत. कापसाइतका म्हातारा हो, अशी एक मान्यता असते. इथे तर कापसाच्या बरोबरीने तांबट पक्ष्यांच्या अनेक पिढ्या सावरीच्या म्हाताऱ्या खोडाने घडवल्या!

कालांतराने सावर सडली. उन्मळून पडली. तांबटाच्या नव्या पिढीला आसपास म्हातारी खोडं कोणती, ते शोधायचे काम येऊन पडले. सगळीकडे रसरशीत हिरवी खोडं. त्यात एक राय आवळा तांबट पक्ष्याला सापडला. ह्याची गंमत म्हणजे झाड मरायला टेकलंय असं वाटता वाटता ह्याला हिरवी बहार येते. काही जुनी, सडकी खोडं आणि बाजूने रसदार खोडावर हिरवागार पाला, जो फांद्या पार झाकून टाकतो. तांबट पक्ष्याने राय आवळ्यावर पाहणी करून पाहिली. जवळच एक कडुनिंब सुद्धा होता. ह्याची थोडी छाटणी झालेली होती. त्या छाटलेल्या खोडात तांबट पक्ष्याने चोचा मारून बघितल्या खूप. पण हे एक महा चिवट झाड. असं सहज बधत नाही ते. तांबट त्याच्या जीवाने कोरू शकेल, असं सध्या तरी राय आवळ्याचेच खोड त्याला परिसरात उपलब्ध आहे. त्याची निवड तो करतो की हा परिसर सोडून वेगळ्याच कुठल्या म्हाताऱ्या खोडाच्या भजनी लागतो, ते मौसमच सांगेल आता… तोवर तांबट पक्ष्याचा तो ठोक ठोक ठोक आवाज इथे गुंजत राहणार, हे मात्र नक्‍की!

तिकडे मयूरपंखीच्या झुडुपात बुलबुल घरटे लपवून ठेवत असे स्वतःचे. दिवस सरले बरेच. पिल्लं उडून गेली. मग मयूरपंखीवर फुलपाखरांचे कोष लगडलेले दिसले. आता मधमाश्‍यांचे माहेर झालेय ते झुडूप. तिथे कावळ्याने हल्ला केला. माश्‍या घोंघावून परत शांत होतात. एकाच झाडावर किती वेगवेगळे जीव येऊन राहात असतात! एकदा सकाळी सकाळी आवळ्याच्या झाडावर घारीने मधाच्या पोळ्यावर हल्ला केलेला बघितला. आवळा, नारळ, फणस, कडुनिंब, आंबा, ट्याब्युबिया, मध्येच पेरू आणि ट्रम्पेट फ्लॉवर अशा हिरव्याच्याच वेगवेगळ्या शेडस्‌वाल्या कॅनव्हासमधून स्वच्छ निळे आकाश त्याच झाडांना सोबत करत असते. भारद्वाजाची पिल्ले टुणूक टुणूक उड्या मारत जांभूळ ते नारळ ते फणस अशा त्यांच्या हायवेने फिरत असतात. पण घराकडे जाताना कोणता गुप्त मार्ग वापरतात माहीत नाही. घर सापडत नाही त्यांचे. नारळाची पिल्ले मात्र ते शहाळी फोडून फस्त करतात. हुदहुद आणि हळद्या अलीकडे दिसत नाहीत. खंड्या, खाटीक रोज येतात. बाकीचे चिल्ले पिल्ले पक्षी देखील भरपूर आहेत. खंड्या रोज ठरावीक वेळी शेवग्यावर येऊन बसतो. चिंतन करतो तो एका जागी बसून आणि गप्पी मासा टिपतो हौदातून, अगदी क्षणात. चिंतन करत बसण्यातच आयुष्य गळाला लागायची एक संधी असते, हेच जणू तो सांगत असतो.

– प्राची पाठक

Leave A Reply

Your email address will not be published.