कोरेगाव, दि. 3 (प्रतिनिधी) – कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने 16 जागांवर विजय मिळवला. आमदार महेश शिंदे यांच्या कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडीला एक जागा मिळाली तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली.
कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल आणि आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडीतर्फे 18 पैकी 17-17 जागांवर उमेदवार उभे केले होते. हमाल मापाडी मतदार संघामध्ये दोन्ही पॅनेलला उमेदवार मिळाला नाही. त्या जागेवर दोन्ही अपक्ष उभे राहिले होते. इतर नऊ उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल होते होते. अशा एकूण 18 जागेसाठी 45 उमेदवारांनी निवडणूक लढवली. खरी निवडणूक आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनेलमध्ये झाली. दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचे रान उठवले होते. संपूर्ण तालुका पिंजून काढला.
बाजार समितीच्या मैदानात पहिल्यांदाच आमदार महेश शिंदे यांनी जिल्हा बॅंकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती भीमराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पॅनेल उभे करीत कडवे आव्हान दिले. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट होते. तालुक्यातील राजकीय मैदानात शिंदे विरुद्ध शिंदे सामना जोरदार रंगला. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी बाजी मारली. महेश शिंदेंना पराभवला समोरे जावे लागले. रविवारी येथील गीताई मंगल केंद्रात सकाळी 10 वाजता तहसीलदार अमोल कदम, पोलिस उपअधिक्षक गणेश किंद्रे यांच्या उपस्थितीत मतमोजणी शांततेत पार पडली.
पहिला निकाल हमाल मापाडी मतदार संघाचा जाहीर झाला. त्यामध्ये अपक्ष उमेदवार संजय बर्गे 55 मते घेऊन विजयी ठरले. व्यापारी मतदार संघाची मतमोजणी झाली. यामध्ये आमदार महेश शिंदे यांच्या पॅनेलचे सुनील निदान यांना (295) व आमदार शशिकांत शिंदे यांच्या शेतकरी विकास पॅनेलचे राहुल बर्गे यांनी (306) मते मिळवीत यश मिळवले. सोसायटी मतदार संघातून शेतकरी विकास पॅनलचे ऍड. पांडुरंग भोसले (592), कल्याण भोसले (589), जयवंत घोरपडे (587), राहुल निकम (587), दिलीप अहीरेकर (571), प्रमोद धुमाळ (570), अधिक माने (557) मते मिळवीत विजयी झाले. महिला राखीव मतदार संघातून वैशाली भोसले (599), साधना चव्हाण (592 मते) मिळवून विजयी ठरल्या. इतर मागास प्रवर्गातून अमोल राशिंनकर (613) मते घेऊन विजयी ठरले. भ.जा प्रवर्गातून केशव मदने यांनी (621) घेत विजय मिळविला. ग्रामपंचायत मतदार संघातून बापुसो चव्हाण (671) व विशाल शिंगटे हे (619) मते मिळवीत विजयी ठरले. या विजयामुळे राष्ट्रवादीला बुस्टर डोस मिळाला असून कार्यकर्त्यांनी “राष्ट्रवादी पुन्हा’चा जयघोष केला.