पणजी – जुगराज सिंगच्या हॅट्ट्रिकमुळे महाराष्ट्राच्या पुरुष हॉकी संघाने दिल्लीवर ४-२ असा दिमाखदार विजय मिळवला. ब-गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली.
मापुसा येथील पेड्डेम क्रीडा संकुलात चालू असलेल्या हॉकी क्रीडा प्रकाराच्या साखळी सामन्यात सहाव्या मिनिटाला अजिंक्य जाधवने मैदानी गोल करीत महाराष्ट्राचे खाते उघडले. त्यामुळे पहिल्या सत्रात महाराष्ट्राकडे १-० अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रात २१व्या मिनिटाला गोविंद बिश्तने मैदानी गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. परंतु पाचच मिनिटांनी जुगराजने (२६व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केला. त्यामुळे मध्यंतराला महाराष्ट्राकडे २-१ अशी आघाडी होती.
National Games 2023 (Sailing) : महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळला नौकानयनमध्ये रौप्यपदक…
तिसऱ्या सत्रात ३७व्या मिनिटाला जुगराजने पेनल्टी कॉर्नरच्या सहाय्याने दुसरा गोल नोंदवत महाराष्ट्राची आघाडी ३-१ अशी वाढवली. पुढच्याच मिनिटाला दिल्लीच्या धीरज वत्सने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत हा फरक ३-२ असा कमी केला. मग चौथ्या सत्रात जुगराजने ५७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे तिसरा वैयक्तिक गोल साकारला.
#CWC23 #SAvNZ : दक्षिण आफ्रिकेकडून इंग्लंडच्या विक्रमाला सुरुंग, 2019 चा मोठा विक्रम केला उद्ध्वस्त…
आंतरराष्ट्रीय हॉकीपटू युवराज वाल्मिकीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या पुरुष हॉकी संघाने सोमवारी ओडिशाचा २-१ असा पराभव करून राष्ट्रीय स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली होती.