World Cup 2023 New Zealand vs South Africa Match : पुण्याच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या विश्वचषक 2023 च्या 32व्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली . क्विंटन डी कॉकची बॅट पुन्हा एकदा तळपली आणि त्याने या विश्वचषकातील चौथे शतक झळकावले. त्याचवेळी रॅसी व्हॅन डर ड्युसेननेही 133 धावांची संस्मरणीय खेळी केली.
राहिलेली कसर डेव्हिड मिलरने शेवटच्या षटकांमध्ये अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक ठोकून पूर्ण केली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 4 गडी गमावून 357 धावा केल्या. यासह टेंबा बावुमाच्या संघाने विश्वचषकाच्या एकाच मोसमात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद…
दक्षिण आफ्रिकेचा संघ आता वनडे विश्वचषकाच्या एकाच मोसमात सर्वाधिक षटकार मारणारा संघ बनला आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आतापर्यंत एकूण 82 षटकार ठोकले आहेत. या बाबतीत दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला मागे टाकले आहे. इंग्लिश संघाने 2019 मध्ये 76 षटकार मारले होते. तर, वेस्ट इंडिजने 2015 मध्ये 68 षटकार मारले होते.
ODI World Cup : Most Team Sixes in One Edition
दक्षिण आफ्रिका 82* (विश्वचषक 2023)
इंग्लंड 76 (विश्वचषक 2019)
वेस्ट इंडिज 68 (विश्वचषक 2015)
आॅस्ट्रेलिया 67 (विश्वचषक 2007)
आॅस्ट्रेलिया 61 (विश्वचषक 2023)
ऑस्ट्रेलियाशी केली बरोबरी..
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ एका वेगळ्याच टचमध्ये असल्याचे दिसत आहे. पुण्याच्या मैदानावर बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकांत 4 बाद 357 धावा केल्या. याबरोबरच एका विश्वचषकात चार वेळा 350 हून अधिक धावा करणारा दक्षिण आफ्रिका पहिला संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडपूर्वी श्रीलंका (428/5), इंग्लंड (399/7) आणि बांगलादेश (382/5) विरुद्ध हा पराक्रम केला होता. दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकात सर्वाधिक 350 पेक्षा जास्त धावसंख्येच्या स्कोअरमध्ये ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली आहे. दोघांनी 9-9 वेळा असे केले. भारताने चारवेळा ही कामगिरी केली.
न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने आपली सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. दक्षिण आफ्रिका संघाने यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध 324/4 (सेंच्युरियन 2000), 314/7 (सेंच्युरियन 1994) आणि 306/6 (जोहान्सबर्ग 2003) अशी एकूण धावसंख्या केली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत सलग आठव्या वनडे सामन्यात 300 पेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडला आहे. दक्षिण आफ्रिकेने या कालावधीत पाच वेळा 350 प्लस धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेने मागील 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी केल्यानंतरची धावसंख्या…
338/6 विरूध्द ऑस्ट्रेलिया
416/5 विरूध्द ऑस्ट्रेलिया
315/9 विरूध्द ऑस्ट्रेलिया
428/5 विरूध्दश्रीलंका
311/7 विरूध्द ऑस्ट्रेलिया
399/7 विरूध्द इंग्लैंड
382/5 विरूध्द बांग्लादेश
357/4 विरूध्द न्यूझीलंड