Jejuri (Maharashtra) – ऐतिहासिक वारसा-महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाची धार्मिक सांस्कृतिक राजधानी असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा निस्सीम भक्त आणि मानकरी असलेल्या पानसरे परिवारातील जुनेद मेहबूबभाई पानसरे (वय 23) याची महाराष्ट्र हॉकी संघातून राष्ट्रीय पातळीसाठी निवड करण्यात आली आहे.
तामिळनाडू व चेन्नई येथे झालेल्या 13व्या सिनियर नॅशनल स्पर्धेमध्ये राज्यातील 18 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, यामध्ये जेजुरीतील जुनेद पानसरे व पुण्यातील प्रणव माने हे दोघे आहेत तर इतर अमरावती, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, विदर्भातील खेळाडू असून इन्कमटॅक्स, जीएसटी कस्टम, सेंट्रल रेल्वे आदी विभागातील कर्मचारी व अधिकारी आहेत.
जुनेद पानसरे ( Juned Pansare ) म्हणाले की, माझ्या खेळाची सुरुवात संजीवन विध्यानिकेतन कोल्हापूर येथून इयत्ता 5वी पासून सुरू झाली. तेथे प्रा.रणजित इंगवले हे माझे कोच होते. पुढील काळात पुण्यामध्ये येऊन ज्येेष्ठ हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्या एक्सलँसी अकॅडमी मध्ये सरावास सुरुवात केली. त्यांच्यासह एडविन मोतीजॉन यांचे कोच म्हणून मार्गदर्शन लाभत आहे. विविध विद्यापीठअंतर्गत सुमारे 15 ते20 सामन्यांमध्ये सहभाग घेत खेळलो असून आतापर्यंत पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, चेन्नई, छत्तीसगड आदी राज्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
पैकी चेन्नईमध्ये झालेल्या सान्याचे कर्णधार हॉकीपटू युवराज वाल्मिकी (आलिंम्पिक खेळाडू), त्यांचे बंधू हॉकीपटू देवेंद्र वाल्मिकी यांचे तसेच भारतीय हॉकी संघाचे कोच ऑड्रिंन डिसोझा, पुणे येथील हॉकीपटू सूरज करकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विविध राज्यांमध्ये सामन्यासाठी जाताना महाराष्ट्र हॉकी असोशिएशनच्या वतीने उच्च दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. विशेषतः महाराष्ट्र हॉकी संघाचे अध्यक्ष मनोज भोरे (पुणे) यांच्याकडून याबाबत दक्षता घेतली जाते. पुढील काळात हॉकी मध्येच भवितव्य घडवायचे असून माझ्या परिवाराचे मला पूर्णपणे पाठबळ मिळत आहे.
मला भारताच्या टीशर्टमध्ये आणि राष्ट्रीय पातळीवर खेळताना पाहण्याचे स्वप्न माझे वडील स्व. मेहबूबभाई पानसरे पहायचे, तसे ते नेहमी बोलून दाखवायचे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेणार आहे. असे जुनेद पानसरे यांनी सांगितले. जेजुरी नगरपालिकेच्या नगरसेविका अमिना पानसरे, माजी नगरसेवक स्व. मेहबूब पानसरे यांच्याबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांचे विशेष जिव्हाळ्याचे नाते असल्याने खा. सुळे यांच्याकडून सुद्धा जुनेद पानसरे यांना मार्गदर्शन व सहकार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.