नाशिक :- जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ चा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज शहरातील वीर सावरकर हॉल, सावतानगर, सिडको येथे आंनदाचा शिधा वितरण शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी मंत्री छगन भुजबळ बोलत होते.
या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, पुरवठा विभागाच्या उपायुक्त प्रज्ञा बढे-मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, सहाय्यक पुरवठा अधिकारी कैलास पवार, रास्तभाव दुकानदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिक रोड येथील पुरवठा अधिकारी कार्यालय आहे त्याच ठिकाणी ठेवून शहरातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने शहर पुरवठा अधिकारी पदाचे श्रेणीवर्धन करून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शहर पुरवठा अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. गौरी-गणपती, दिवाळी आणि गुढीपाडवा या सणांना शिधा पत्रिका धारकांना 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो चणाडाळ व 1 किलो तेल या चार जिन्नसाचा समावेश असलेला संच वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
गणेशोत्सवानिमित्त सप्टेंबरमध्ये आनंदाचा शिधाचे प्रति शिधापत्रिका धारकांना ई-पॉस प्रणालीद्वारे केवळ 100 रूपयांत वितरीत केला जाणार असून जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे बीपीएल, पिवळे, प्राधान्य केसरी शिधापत्रिकाधारकांनाही याचा लाभ होणार आहे. शहरातील 230 रास्त भाव दुकानांतून या शिधासंचाचे वाटप होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.
मंत्री भुजबळ पुढे म्हणाले, आनंदाचा शिधा हा शिधा पत्रिकाधारकांचा हक्क असून प्रत्येक शिधा पत्रिकाधारकांपर्यंत हा लाभ पोहचला पाहिजे, या कामात कोणतीही हयगय होणार नाही याची अधिकारी व रास्त भाव दुकानदार यांनी दक्षता घ्यावी अशा सूचनाही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या. येत्या दोन ते तीन दिवसांत रास्त भाव दुकानदारांनी आनंदाचा शिधा वितरण पूर्ण करावे अशा सूचनाही मंत्री भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आंनदाचा शिधा वाटपाचा घेतलेल्या निर्णयामुळे सणांचा गोडवा निश्चितच वाढणार असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हापुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले. यावेळी मंत्री छगन भुजबळ व मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना प्रातिनिधीक स्वरूपात आनंदाचा शिधा संचाचे विरतण करण्यात आले.