मेहता यांच्यावरही सिंग यांचे आरोप
नवी दिल्ली – भारतीय ऑलिम्पिक संघटनेत गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र बात्रा व सुधांशू मित्तल यांच्यातील वाद सुरू असतानाच संघटनेतील सदस्य भोलानाथ सिंग यांनी सरचिटणीस राजीव मेहता यांच्याच नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.
मेहता हे एकाच वेळी तीन क्रीडा संघटनांचे पद कसे काय भूषवू शकतात, असा सवाल करताना सिंग यांनी क्रीडा सचिवांनाही पत्र लिहिले आहे व आपला आक्षेप नोंदवला आहे. बात्रा यांच्या नियुक्तीला मित्तल यांनी वारंवार आव्हान दिले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटना यांनी बात्रा यांना पाठिंबा देताना मित्तल यांचेच आरोप निरर्थक असल्याचे स्पष्ट केले होते. आता सिंग यांनी केलेल्या या दाव्यावर या दोन्ही संघटना काय प्रतिक्रिया देतात यावर हा वाद आता क्रीडा लवादाकडे जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऑलिम्पिक संघटना, तलवारबाजी संघटना व खो-खो संघटना अशा तीनही संघटनांवर मेहता कसे काय पद भूषवू शकतात, असे मत व्यक्त करतानाच सिंग यांनी हा 2011 च्या राष्ट्रीय आचारसंहितेचा भंग असल्याचे म्हटले आहे. या आचारसंहितेनुसार कोणताही व्यक्ती एकाच संघटनेतील पदावर कार्यरत राहू शकतो; पण मेहता यांनी हे सर्व नियम धाब्यावरच बसवलेले आहेत, अशी टीकाही सिंग यांनी केली आहे.