11 दिवसांच्या लॉकडाऊननंतर नांदेड शहर पूर्वपदावर, पण…

नांदेड – करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड शहर आणि जिल्ह्यात 11 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. अखेर दि. 5 रोजी पहाटेपासून शहर पूर्वपदावर आले आहे. पण, आता राज्य शासनाने जाहीर केलेला शनिवार-रविवार लॉकडाऊनचा निर्णय पुन्हा लागू होण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात करोना बाधितांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्यासाठी या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. या दरम्यान, लग्नसराई होती. पण, मार्केट बंद असल्याने अनेकांना अडचणी सहन कराव्या लागल्या. विशेषत: व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, लॉकडाऊनचे पहिले पाच दिवस अत्यंत कठोर निर्बंध राबवल्यानंतर पुढचे 6 दिवस त्यात अंशत: शिथिलता आणली गेली. ठराविक वेळेत किराणा आणि अन्य दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती.

सोमवारी (दि. 5) व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी राज्य शासनाच्या निर्देशानुसार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व व्यवहार उरकावे लागणार आहेत. त्यामुळे बॅंका, किराणा दुकाने, भाजी मंडईसारख्या ठिकाणी दिवसभर गर्दी दिसून आली. तर, काही व्यापारी मात्र ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते.

येत्या शनिवार-रविवारी पुन्हा पूर्णत: लॉकडाऊन असल्याने नागरिकांना आता पुढील 4 दिवसांतच अत्यावश्यक साहित्यांची खरेदी करावी लागणार आहे. तर, करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने नागरिकही दबकत आणि मास्क-सॅनिटायझर अशा सुरक्षा साधनांचा वापर करत बाजारात येत असल्याचे दृश्य आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.