कारण अद्याप अस्पष्ट; दोन संशयित ताब्यात
श्रीगोंदा – चार अज्ञातांनी घरात घुसून धारदार हत्याराने वार केल्याने गंभीर जखमी होऊन योगेश सुभाष शेळके (वय ३५ ) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कोथुळ शिवारात मंगळवारी (दि.३०) रात्री अडीच वाजण्याच्या घडली. याप्रकरणी मयताची पत्नी आरती योगेश शेळके (वय २६) यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात चार अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समजते.
शेळके कुटुंबीय गेल्या पाच वर्षांपासून कुटुंबासह तालुक्यातील कोथुळ येथे राहत आहेत. मंगळवारी (दि.३०) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा वाजविल्याने फिर्यादीने घराचा दरवाजा उघडला.
त्यावेळी चार जणांनी घरात प्रवेश करीत एकाने फिर्यादीच्या गळ्याला कोयता लावुन “तू काही बोलली तर तुला मारुन टाकीन” असा दम दिला. तर उर्वरित तिघांनी फिर्यादीचे पती योगेश शेळके याच्याजवळ जाऊन काहीएक न बोलता धारदार हत्याराने गळ्यावर वार करीत गंभीर जखमी केले. यावेळी योगेश शेळके याने प्रतिकार केल्याने त्याच्या हाता-पायावर गंभीर दुखापत झाली.
या घटनेत रक्तस्त्राव जास्त झाल्याने योगेश शेळके याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक संतोष भंडारे आणि कर्मचाऱ्यांनी घटास्थळी धाव घेतली. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे भेट देत पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि बेलवंडीचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे पुढील तपास करीत आहेत.