नगर – करोना संसर्ग वाढल्याने आता रुग्णालयामध्ये ऑक्सिजन बेड मिळणे अवघड झाले. त्यात रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्याने आज नगरकरांची गाळण उडाली. नगर जिल्ह्याला दररोज अडीच हजार रेमडेसिविर इंजेक्शन लागतात. त्यात तुलनेत पुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात करोना संसर्ग वाढला असून, दररोज सुमारे दोन हजार रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. करोना रुग्ण संख्या वाढल्याने गेल्या चार दिवसांपासून नगर शहरामध्ये ऑक्सिजन बेड व कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसीयू व ऑक्सिजन बेड पूर्णपणे भरले आहेत. सामन्या रुग्णांना खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणे परवडत नाही. तरी खासगी रुग्णालयामध्ये बेड मिळण्यासाठी नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे.
खासगी रुग्णालयामध्ये बेड मिळाले पण, रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नातेवाईकांची गेल्या दोन दिवसांपासून धावपळ सुरू आहे. मात्र, शहरासह जिल्ह्यात इंजेक्शनचा तुटवडा असल्याने अनेक रुग्णांना काल रेमडेसिविर मिळाले नाही. आजही अनेक रुग्णालयात रेमडेसिविर वाणवा होती. रुग्णांचे नातेवाईक अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेल्या मेडिकलच्या यादीतील फोन नंबर लावून पाहत होते. मात्र, कोणाकडे रेमडेसिविर शिल्लक नसल्याचे सांगितले जात होते.
दरम्यान, खासगी व शासकीय रुग्णालयासाठी स्वतंत्रपणे रेमडेसिविरचा कोठा येत असल्याचे काल अन्न व औषध प्रशासनाने सांगितले. आता शासकीय कोठ्यातून तालुकास्तरावर रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याबाबत हालचाली सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांकडून समजली.