कोपरगाव – महाराष्ट्र शासनाने केलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे छोटे दुकानदार, व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेले वर्षभर छोट्या व्यापाऱ्यांना लॉकडाऊनचा फटका बसल्यामुळे व्यापार व इतर व्यवहार ठप्प झाले आहे. तरीही शासनाने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. या शासनाचे धोरणाच्या निषेधार्थ कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाने आज सकाळी अनोख्या आंदोलनाचे आवाहन केले होते.
या आवाहनानुसार कोपरगाव शहरातील दुकानदारांनी लॉकडाऊनच्या विरोधात घोषणा फलक हातात धरून, सविनय कायदे पालन करत तसेच डोक्याला काळ्या फिती बांधून कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता किंवा जमावबंदीचा भंग न करता आपापल्या दुकानासमोर निषेध फलक हातात धरून अभिनव अशा स्वरूपाचे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
व्यापाऱ्यांच्या वतीने भावना व्यक्त करताना कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले, शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळते, शेतकरी, बड्या उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात अनुदान मिळते. त्याला आमचा विरोध नाही, परंतु छोट्या व्यापाऱ्यांना देखील लॉकडाऊनच्या काळात लॉकडाऊन भत्ता सरकारने चालू करावा, त्यानंतरच आम्हाला दुकाने बंद करण्याचे आदेश द्यावे.
लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करताना महाराष्ट्र शासनाने मोठे उद्योजक, भांडवलदार, चित्रपट निर्माते यांच्याशी चर्चा केली, परंतु छोट्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. गेले वर्षभर छोट्या व्यापाऱ्यांची लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक झळी सोसल्या आहेत. आता पुन्हा छोट्या दुकानदारांवर अन्याय करण्याच्या या धोरणाचा आम्ही निषेध करीत आहोत, असे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी सांगितले.
यावेळी कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब, व्यापारी महासंघाचे नरेंद्र कुर्लेकर, सत्येन मुंदडा, नारायण अग्रवाल, चांगदेव शिरोडे, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बागुल, स्टेशनरी असोसिएशनचे रमेश शिरोडे, उल्हास गवारे,निलेश मुंदडा, महावीर सोनी, तिलक अरोरा यांचेसह कोपरगाव व्यापारी समितीचे अकबर शेख व संघर्ष समितीचे अंकुश वाघ, शरद खरात आणि अनेक व्यापारी प्रतिनिधीसह अनेकांनी निषेध फलके घेवून आपला निषेध व्यक्त केला.