पिंपरी – ऐपतदार दाखला देण्यासाठी सात हजारांची लाच घेताना नायब तहसीलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. 25) करण्यात आली.
विकी मदनसिंग परदेशी (वय 37, रा. वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 33 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकी अपर हवेली तहसीलदार कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे निवासी नायब तहसीलदार या पदावर कार्यरत आहे. तक्रारदार यांना ऐपतदार दाखला (सोलव्हनसी सर्टिफिकेट) देण्यासाठी आरोपीने सात हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार यांनी याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार आरोपी लाच मागत असल्याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर बुधवारी सापळा रचून सात हजार रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सीमा मेहेंदळे, श्रीहरी पाटील, कर्मचारी विनोद भोकरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.