म्हैसूर – कर्नाटाकमध्ये सध्या दोन महिला आयएएस अधिकाऱ्यांमधील वाद चर्चेत आला आहे. वाद एवढा वाढला की, एका महिला अधिकाऱ्याने राजीनामा देण्याची घोषणा करून टाकली आहे. म्हैसूर शहराच्या महापालिका आयुक्त शिल्पा नाग यांनी आपल्या वरिष्ठ रोहिणी सिंधुरी यांच्यावर काम करू देत नसल्याचा आरोप करत राजीनामा दिला आहे. रोहिणी सिंधुरी म्हैसूरच्या उपायुक्त आहेत.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शिल्पा यांचं म्हणणं आहे की, करोना महामारीच्या काळात आपण जसं काम करू इच्छितो, तस करू दिलं जात नाही. दुसरीकडे रोहिणी यांनी आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटलं की, शिल्पा नाग यांनी कोविड-१९ वार्डचा दिलेला डेटा विरोधाभासी होता.
शिल्पा नाग, २०१४ आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांना याच वर्षी म्हैसूर सिटी आयुक्तपदाची जबाबदारी मिळाली. त्यांच म्हणणं आहे की, म्हैसूर शहराने करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी चांगलं काम केलं आहे. मात्र काम करू देत नसल्यामुळे अशा वातावरणात आपण काम करू शकत नसल्याचं शिल्पा यांनी म्हटलं.
दुसरीकडे रोहिणी या २००९ बँचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. शिल्पा आपलं कर्तव्य योग्य रितीने बजावत नाहीत. म्हैसूरमध्ये प्रत्येक वॉर्डमधील करोनाचे ऍक्टीव्ह रुग्ण आणि मृतांच्या आकडेवारीत विरोधाभास आहे. तरी शिल्पा यांनी अंतर्गत बाबी अशा चव्हाट्यावर आणायला नको, असंही रोहिणी यांनी नमूद केलं.