पुणे – दहा वर्षाच्या भाचीवर बलात्कार करणाऱ्या मामाला 14 वर्षे सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश आर.यु.मालवण्कर यांनी सुनावली. दंड न भरल्यास 1 वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
ही घटना हडपसर भागात 11 डिसेंबर 2016 रोजी घडली. आरोपी 25 वर्षीय आहे. याबाबत घराच्या शेजारी राहणाऱ्या 31 वर्षीय महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादींच्या घराशेजारी आरोपी आई, बहिणीच्या कुटुंबियांसोबत राहत होता. घटनेपूर्वी आठ दिवसच ते तेथे राहण्यात आले होते. नळाला पाणी आल्याबाबत सांगण्यासाठी फिर्यादी आरोपीच्या घरी गेली. आरोपीने दरवाजा उघडला. त्यावेळी त्याची दहा वर्षाची भाची घाबरुन रडत रडत घराबाहेर पडली.
फिर्यादीने याबाबत तिला घरी नेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी तिने मामाने बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने मुलीच्या वडिलांचा फोन नंबर मिळवून, त्यांना घडलेल्या घटनेबाबत सांगितले. घटनास्थळी ते दाखल झले. त्यावेळी त्यांचेसह शेजाऱ्यांनी आरोपीला घराबाहेर काढत मारहाण करुन पोलिसांचे स्वाधीन केले.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनिल हांडे यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. मुलीच्या वैद्यकीय तपासणीत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे सिध्द झाले.
पीडितेचा जबाब आणि वैद्यकीय अहवाल महत्त्वपूर्ण मानत न्यायालयाने बलात्कार आणि बाललैंग़िक अत्याचाराच्या विविध कलमानुसार दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. या घटनेचा तपास हडपसर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रुपाली माळी यांनी केला. तर न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कर्मचारी ए.एस.गायकवाड यांनी मदत केली.