नवी दिल्ली – भारतातील एक शीख विद्यार्थी लंडनमध्ये बेपत्ता झाला आहे. या विद्यार्थ्याच्या शोधासाठी भाजपच्या नेत्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना मदतीचे आवाहन केले आहे. गुरशमान सिंग भाटिया असे या बेपत्ता झालेल्या पंजाबी विद्यार्थ्याचे नाव असून तो लॉफबरो विद्यापिठाचा विद्यार्थी आहे. तो १५ डिसेंबरपासून बेपत्ता आहे, असे भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
भाटियाला शेवटचे पूर्व लंडनमधील कॅनरी वार्फ येथे पाहिले गेले होते, लॉफबरो विद्यापीठ आणि भारतीय उच्चायुक्तांना त्याचा शोध घेण्याचे आवाहन देखील सिरसाच्या यांनी केले आहे.
सिरसा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या विद्यापीठाच्या ओळखपत्रानुसार भाटिया हा पदव्युत्तर विद्यार्थी होता. भाटिया याला दोन वर्षांचा ब्रिटनमधील निवास परवाना देण्यात आला आहे., हा परवाना २ जून २०२४ पर्यंत वैध आहे.
इंग्लंडमधील लीसेस्टरशायर येथे स्थित, लॉफबरो युनिव्हर्सिटीत १३० हून अधिक देशांतील सुमारे १८ हजार आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत, असे विद्यापिठाच्या वेबसाइटवर म्हटले आहे.