पिंपरी, (प्रतिनिधी) – विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित अभिनेता रणदिप हुड्डा यांच्या प्रमुख भूमिकेतील “सावरकर” हा चित्रपट येत्या २२ मार्च पासून प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान चित्रपटावर आक्षेप घेत पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक याठिकाणी विरोध प्रदर्शन करण्यात आले.
शहरातील एकाही सिनेमागृहात शो होऊ देणार नाही, असा इशारा शहरातील आंबेडकरी पक्ष संघटनांनी दिला आहे. सावरकर चित्रपटांतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्तिरेखेत बदल करावा अथवा सीन कट करण्याची मागणी करण्यात आली.
चित्रपटात बाबासाहेबांचा चेहरा त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे फोटो उपलब्ध आहे. चेहर्यावर प्रखर तेज होते. मात्र चित्रपटात ऐतिहासिक पात्र निवडताना साधर्म्य नसल्याचा आरोप आंबेडकरी संघटनांनी केला आहे. तात्काळ या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी.
बाबासाहेबांच्या भूमिकेतील केलेले संपूर्ण चित्रकरण रद्द करुन दिग्दर्शक, निर्माता, अभिनेत्यासह संबंधित संपूर्ण टीम वर भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.