शिक्षण मंडळाची मान्यता प्रमाणपत्रही मिळणार
पिंपरी – महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच संगीताची गोडी लागावी यासाठी शिक्षण मंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाचे धडे देण्यात येणार असून, सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफ.एम.कडून मोफत संगीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. शाळेच्या शेवटच्या वर्षात विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना सरकारमान्य संस्थेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
महापालिकेच्या सुमारे 119 प्राथमिक शाळा आहेत. मागील काही दिवसांपासून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीबरोबरच शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध कलागुणांची आवड निर्माण व्हावी यासाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळेतील बहुतांश विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी संगीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण दिल्यास शाळेची गोडी लागेलच, शिवाय शाळांचा दर्जा वाढेल.