नदी दिल्ली : प्रसिध्द संगीतकार एम्. एम्. किरवाणी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी किरवाणी यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त केली जात आहे.
एका मुलाखतीमध्ये एम्. एम्. किरवाणी यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, “मला कोरोनाची लागण झाली आहे. प्रवास आणि उत्साहाचा हा परिणाम आहे. सध्या मी औषधोपचार घेत असून मला डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला आहे.”
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आरआरआर चित्रपटातील एम्. एम्. किरवाणी यांच्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने बेस्ट ऑरिजनल साँग या कॅटेगिरीमधील पुरस्कार पटकावला होता. तेव्हा आनंद व्यक्त करत ते म्हणाले होते की, “आरआरआर चित्रपटाचा भारतीयांना अभिमान वाटावा, अशी माझी इच्छा होती. राजामौली आणि माझ्या कुटुंबाची देखील तिच इच्छा होती. आता ऑस्कर जिंकल्यानंतर मला टॉप ऑफ द वर्ल्ड असल्यासारखे वाटत आहे.”
विशेष म्हणजे गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार देखील ‘नाटू नाटू’ या गाण्याने पटकावला. त्यामुळे या चित्रपटासह त्यातील गाण्यांची सध्या जगभरात चर्चा रंगली आहे.