विशेष न्यायालयाच्या आदेशातील अघोरीपणा उघड
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्करी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली विशेष न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या आदेशामध्ये असलेला अघोरीपणा उघड झाला आहे. जर फाशी देण्यापूर्वीच मुशर्रफ यांचा मृत्यू झाला, तर मुशर्रफ यांचा मृतदेह इस्लामाबादेतील मध्यवर्ती चौकात ओढत आणला जावा आणितेथे 3 दिवस लटकवला जावा, असे या आदेशामध्ये म्हटले आहे.
167 पानी या निकालपत्राला पेशावरच्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांनी अधिकृत केले आहे. न्या. सेठ यांच्याच नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पिठाने मुशर्रफ यांना मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. राज्यघटनेचा विकृत विपर्यास केल्याबद्दल ही शिक्षा सुनावली गेली आहे.
“जे काही पाहिले गेले आहे त्याची दखल घेणे आवश्यक असल्याने आम्ही आरोपीला आरोपानुसार दोषी मानले आहे. दोषीला प्रत्येक आरोपानुसार मरेपर्यंत त्याच्या फाशी देण्यात येईल.’ असे या निकालात म्हटले आहे.
मुशर्रफ फाशीच्या आधी मरण पावले तरी त्यांना इस्लामाबादेतील डी-चौकात ओढत आणून फाशी देण्यात यावी आणि तीन दिवस लटकवून ठेवावे, असे न्या. सेठ यांनी म्हटले आहे. या निर्णयाची 2-1 ने विभागणी झाली. लाहोर हायकोर्टाचे न्या. शाहिद करीम यांनी फाशीच्या शिक्षेस पाठिंबा दर्शविला तर सिंध हायकोर्टाचे न्या. नाझर अकबर यांनी असहमती दर्शविली.